नवी दिल्ली : गगनाला भिडणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपायांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही कपात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर दरात या महिन्यातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर दरात ९१.५० रुपयांची घट झाली. कोलकात्यात १००, तर मुंबईत ९२.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरच्या किमती गॅस कंपन्या ठरवत असतात. त्याप्रमाणे गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३६ रुपायंची कपात करण्यात आली होती. गॅस सिलिंडर दरात कपात करण्यात आल्यानंतर दिल्लीत प्रति सिलिंडर १८८५ रुपये मोजावे लागणार आहेत, तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी १८४४ रुपये मोजावे लागणार आहेत. हाच दर कोलकातामध्ये १९९५.५ रुपये आहे. ६ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत सध्या गॅस सिलिंडरची किंमत १०५२ रुपये आहे. दिल्लीत १०५३ रुपये, कोलकाता १०७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १०६८ रुपये आहेत.

व्यावसायिक सिलिंडर दरात कपात झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र एकीकडे किमतीत कपात होत असतानाही हॉटेलमधील अन्नपदार्थांच्या किमती कमी झालेल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून सतत किमतीत कपात झाल्यानंतरही हॉटेलचे जेवण महागच राहिले आहे.