उत्तराखंड (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधील द्रौपदीच्या दांडा-२ पर्वताच्या शिखराजवळ हिमस्खलन होऊन १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून, ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

पुष्कर सिंह धामी यांनी गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे हवाई दलाची मदत मागितली आहे. ‘आएएफ’ने बचाव आणि मदत कार्यासाठी २ चित्ता हेलिकॉप्टर तैनात केले आहेत, इतर कोणत्याही गरजांसाठी हेलिकॉप्टरचा इतर सर्व ताफा स्टँडबायवर ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि आयटीबीपी अधिकारी सध्या बचावकार्यात सहभागी आहेत. हिमस्सखलन झाल्याने नेहरु माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षणार्थी अडकले आहेत.

नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रमादरम्यान दांडा येथे हिमस्खलनामुळे दोन प्रशिक्षकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रशिक्षक उत्तरकाशी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव पथक इतर प्रशिक्षणार्थींना वाचवण्यात व्यस्त आहे. उत्तरकाशीच्या द्रौपदी का दांडा भागात ४० जणांचे पथक प्रगत प्रशिक्षणासाठी गेले होते. हे ठिकाण पाच हजार मीटर उंचीवर आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिमस्खलनात दोन प्रशिक्षकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशीही बोलून घटनेची माहिती घेतली. त्यांनी हवाई दलाला बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.