कागल (प्रतिनिधी) : कागल येथे रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी एक लाख रुपये बक्षिसांची पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी, तसेच उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपरिक वेशभूषा या स्पर्धा होणार आहेत. राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रोत्साहनातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, पारंपरिक खेळ व गौरी गीतांचा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच सण-उत्सव उत्सवांवर निर्बंध होते. निर्बंध उठवल्यानंतर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २१ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी १५  हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी १० हजार, चौथ्या क्रमांकासाठी ७ हजार, पाचव्या क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. वैयक्तिक ५०० रुपये ते १००० रुपयांपर्यंतची आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. याशिवाय ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या पाच महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे. शाहू हॉल कागल येथे दुपारी एक ते रात्री नऊ या वेळेत या स्पर्धा होतील, अशी माहितीही यावेळी नवोदिता घाटगे यांनी दिली. यावेळी नगरसेविका विजया निंबाळकर, नम्रता कुलकर्णी, सुधा कदम व अरुण गुरव आदी उपस्थित होते. महिला बचत गट व महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी राजमाता जिजाऊ महिला समितीने नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या स्पर्धास्थळी वेगवेगळ्या वस्तू व पदार्थ विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.