कोल्हापूर (असित बनगे) : ‘आ’ म्हणजे आत्मा ‘ई’ म्हणजे ईश्वर. देव काही स्वतः प्रत्येकाजवळ येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली असे म्हटले जाते. आज १२ मे जागतिक मातृदिन…आईची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही. तिचं नुसत असणंच सर्वकांही असते. मुलं जेंव्हा पहिल्यांदा कोणता शब्द उच्चारत असेल तर तो म्हणजे आई…

एका आईचही विश्व म्हणजे तिच मुलं, मुलांसाठी सर्वात जास्त कोणी त्रास सहन करत असेल तर ती आई…कोणाहीपेक्षा ९ महिने आईला तिच्या मुलाचा सहवास जास्त लाभला असतो. ९ महिने ती एका जीवाला तिच्या गर्भात वाढवत असते. तिला समाधान मिळते जेंव्हा ती तिच्या बाळाला पहिल्यांदा पाहते. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद लाख मोलाचा असतो…

        स्वामी तिन्ही जगाचा, 
        आई विना भिकारी 

खरंच ज्यांच्या पायाशी सर्व सुखे लोळण घेतात पण त्याच्याकडे आई नाही, तो सर्व काही असूनही भिकारीच म्हणावा लागेल. आई कुठं आहे अस कोणी विचारलं तर जिथं माया आहे तिथं आई आहे असं म्हणाव लागेल. आई कधीही आपल्या मुलाला संकटात बघू शकत नाही. त्याच्यावर कोणतंही संकट येण्याच्या आधी ती त्या संकटाच्या पुढं ढाल बनून उभी राहते. म्हणूनच आईला मायेचा सागर म्हटलं जाते.

आजच्या या धाकाधुकीच्या जीवनात जरी कामाचे, नोकरीचे निमित्त असले तरी मुलं आई वडिलांना विसरली असल्याच निदर्शनात येतंय. आई हे एक असं ठिकाण आहे जिच्या पायाशी सगळी मोहमाया फिकी आहे. मुलं जसजशी मोठी होतात तशी ती आईला गृहीत धरायला लागतात. आई काय आपण कसेही वागलो तरी आपले लाख अपराध पोटात घेते अशी भावना कित्येक मुलांची झालेली आहे. परंतु, आईलाही मन आहे, तिलाही आपल्या मुलांनी आपल्याला वेळ द्यावा, बरे वाईट विचारावे, तिची मायेने विचारपूस करावी असे वाटत असते. मुलांची एक प्रेमळ हाक आईला आनंद देवून जाते.

आज कित्येक जोडपी त्यांच्या आईवडिलांना ओझं समजून वृद्धाश्रमात ठेवतात.पण त्यांनी एकदा विचार करावा की याच आई वडिलांनी तुमच्या जन्मानंतर तुम्हालाही असच ओझं समजून अनाथाश्रमात वाऱ्यावर सोडलं असत तर..? आजची काय परिस्थिती असती..?आई आपल्या मुलाला न्हावू माखू घालते, इतकं मोठं करते आणि आज तीच मुलं तिचा आधार बनायचं सोडून तिलाच बाजूला सारतात, हे किती दुर्दैंव आहे.

आज मातृदिन, या मातृदिनानिमित्त तमाम दुर्दैवी मुलांना इतकच सांगण की, तुम्ही आईची किंमत ठेवलीत तर जग तुमची किंमत ठेवेल. आई नाही तर कोणीच नाही, काहीच नाही. आजची पिढी फक्त एका दिवसासाठी सोशल मिडीयावर स्टेट्स ठेवून जगाला दाखवण्यासाठी मातृदिन साजरा करते. पण खरोखरच ते मनापासून आपल्या आईची किती पर्वा करतात याचा त्यांनी स्वतः विचार करावा, अन् आईला देवासारखे मानावे ही नम्र विनंती…!