टोप (प्रतिनिधी ) : घरात पाणी भरत असताना वीज पंपामध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तरुण ठार झाला. सचिन रामचंद्र कुलकर्णी (वय ४१) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नांव आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी मौजे वडगांव (ता.हातकणंगले) येथे घडली.   

अधिक माहिती अशी की, मौजे वडगांव येथील सचिन कुलकर्णी हे शेती करत   होते. आज सकाळी घरी नळाला पाणी आले होते. त्यासाठी विजेचा पंप लावण्यात आला होता. यावेळी दाब वाढल्याने पाण्याची पाईप निघाली. पंप चालू असताना सचिन पाईप बसवण्यासाठी गेले असता पंपामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने ते चिकटून बसले. आईवडिलांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यत सचिन गतप्राण होऊन खाली कोसळले. वारकरी सांप्रदायात नेहमी रमणारा सचिन मनमिळाऊ होता. त्याच्या  निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.