कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ‘यामिनी’ हे प्रदर्शन दि. १६ ते १८ सप्टेंबरपर्यंत तीन दिवस भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन हॉटेल पॅव्हेलियन येथे भरवले जाणार आहे.

या प्रदर्शनात ९३ हून अधिक विविध वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल्स असणार आहेत. याचे उद्घाटन दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील, मधुरिमाराजे, छत्रपती, नासिर बोरसदवाला आणि अनिरुद्ध तगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा कविता घाटगे, सचिव प्रीती मर्दा, खजानिस डॉ. गीता पिल्लाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनातील जवळपास शंभर स्टॉल्सवर फॅशन आणि लाईफस्टाइलशी निगडित वस्तू, महिला व लहान मुलांचे कपडे, चप्पल, ज्वेलरी, होम डेकोर, नर्सरी यांच्याबरोबर अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. इचलकरंजी, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बेळगाव, रत्नागिरी येथील स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. या वस्तूंच्या विक्रीतून उभा राहणारा निधी हा पूर्णतः सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यासाठी लकी ड्रॉ असणार आहे.

रोटरी क्लब ऑफ गार्गीजने नेर्ली येथील आठवी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या ३२ मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या पाच वर्षांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्थेने उचललेली आहे. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ५००० स्टिकर्स विविध वाहनांवर लावून जनजागृती केली आहे. स्वयम शाळेतील मुलांना दत्तक घेतले. अवयव दानासाठी जागरूकता निर्माण करणे, १००० मुलींना कॅन्सर लस देणे, पौंगडावस्थेतील मुलामुलींचे समुपदेशन असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, असेही अध्यक्षा कविता घाटगे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रीती मंत्री, आरती पवार, विशाखा आपटे, शोभा तावडे, योगिनी कुलकर्णी, सुजाता लोहिया, अंजली मोहिते, मेघना शेळके, सुरेखा इंगळे, सविता पदे, आशा जैन, रेणुका सप्रे, यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.