सांगली (प्रतिनिधी) : “वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण याप्रश्‍नांवरुन राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा, धनगर समाजात असंतोष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत स्वत: ला उमेदवार समजून प्रत्येक मतदारापर्यंत जा, आणि संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा,” असे आवाहन माजी खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी येथे केले.

सांगली खरे क्‍लब हाऊस येथे आज (सोमवार) भाजपच्या वतीने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पदवीधर मतदार संघातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख तर शिक्षक मतदार संघातून सोलापूरचे जितेंद्र पवार हे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले. मेळाव्यास महाडिक यांच्यासह ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार संजय पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर तसेच माजी आमदार सर्वश्री दिनकर पाटील, विलासराव जगताप, भगवान साळुंखे, राजेंद्र देशमुख, नितीन शिंदे उपस्थित होते.