मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत फार कमी जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने सात उमेदवारांची घोषणा केली आहे, तर भाजपनेही मोजक्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपला पक्ष विलीन करू शकतात, अशी चर्चा देखील आता जोर धरु लागली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मनसे एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्यानंतर मनसेने महाराष्ट्रात लोकसभेच्या तीन जागा मागितल्याचं समोर आलं होतं, मात्र अनेक दिवसांनंतरही नवीन अपडेट समोर आलेलं नाही. असे झाल्यास राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. मनसेच्या शिवसेनेत विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले असताना, त्यावर अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही.

न्यू इंडियन एक्स्प्रेसने आपल्या एका बातमीत या राजकीय गोंधळाचा उल्लेख केला आहे. यामध्ये मनसेच्या नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर शिवसेना प्रमुख होण्याची ऑफर मिळाल्याचे मान्य केले आहे. मनसेप्रमुख शिवसेनेत परतले तर ते शिवसेनेचे नेते म्हणून संपूर्ण राज्यात प्रचार करतील. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाची माहिती दिली आहे. ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत, तरीही त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून शिवसेना प्रवेशाचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. एवढेच नाही तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही बाकी आहेत.