कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. विविध माध्यामांतून जोरदार आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी खासदारांसह आमदारांच्या वर दबाव आणण्यात येणार असल्याचे मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष चेतन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्यात होणारी पोलीस भरती स्थगित करावी, ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली खाजगी शैक्षणिक संस्थाकडून वसूल करण्यात येत असलेले शैक्षणिक शुल्क माफ करावे, केंद्रीय पातळीवर विविध संस्थाच्या खाजगीकररणाचे धोरण रद्द करावे, नुकताच केंद्र सरकारने मंजूरीसाठी आणलेले शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करावे, कोरोनाच्या नावाखाली खाजगी दवाखान्याकडून सरेआम सुरू असलेली आर्थिक लूट थांबवावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी आंदोलन करताना शासकीय नियम पाळावेत आणि आपल्या कुटुंबासह स्वतः ची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष शिवाजी खोत, प्रविण पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष हिंदूराव हुजरे पाटील, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, सुधाताई सरनाईक, अनिता जाधव, सुनिता पाटील आदी उपस्थित होते.