कल्याण : कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कल्याणमध्ये तुल्यबळ लढत होणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही, असा इशारा दिला आहे.त्यामुळे राजू पाटील यांच्या निशाण्यावर नक्की कोण असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे. रविवारी कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील पत्रकारांशी बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारासंघाविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

“आमचा उमेदवार या ठिकाणी नाही. मात्र राज ठाकरेंचे आदेश आले नाही त्यामुळे इथे कोणाच्या पार्टीत जायचं हे ठरलं नाही.ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही. आमच्या भावना आम्ही राज ठाकरेंपर्यंत पोहचवू,” असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. “महायुतीत जाणार असं काही राज ठाकरे यांनी म्हटले नाही. आम्ही त्यांना विचारलं पुढची दिशा काय असेल. त्यावेळी त्यांनी गुढीपाडव्याचा मेळावा असतो त्यावेळी दिशा देणार असल्याचे सांगितले. राज साहेब काय बोलतील हे शर्मिला वहिनी ही सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय सांगू. मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताचं बोलतील त्याची गॅरंटी आम्हाला आहे,” असेही राजू पाटील यांनी सांगितले.
 
कल्याण लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाने ज्यांना उतरविले आहे त्या वैशाली देरकर यांनी 2009 मध्ये यापूर्वी मनसेकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे व शिवसेनेचे आनंद परांजपे हे विरोधक होते. दरेकर यांनी त्यावेळी 1 लाख मते घेत तिसऱ्या क्रमांक मिळवला होता. मात्र त्यानंतर मार्च 2016 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला.