कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) येत्या काही दिवसांत लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबतच्या घोषणा ही केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आता महायुतीने दुसऱ्या यादीत ही कोल्हापूरच्या उमेदवारीसाठीची घोषणा न केल्याने पेच आणखी वाढला आहे. त्यामुळे खासदार संजय मंडलिक यांना महायुतीची उमेदवारी मिळणार की त्यांना डावलल्यास बंडखोरी होणार याची आता जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे.

कोल्हापूरसाठी महाविकासने काँग्रेसच्या चिन्हावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केली आहे. याची केवळ घोषणा बाकी आहे. मात्र दुसऱ्याबाजूला महायुतीचा उमेदवारी तिढा सुटने अपेक्षित असताना तो आणखी वाढला असताना विद्यमान खासदारांनी मात्र आपल्यालाच तिकीट मिळणार असा विश्वास व्यक्त करत प्रचाराचा नारळही फोडला आहे. यातच कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन दबावाचे राजकारण सुरू आहे का ? असा ही सवाल आताविचारला जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद

यावर भाष्य करताना खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी मंडलिक यांनाच मिळेल असा विश्वास आहे. मात्र वरिष्ठांनी वेगळा निर्णय घेतल्यास ते बंडखोरी करणार नाहीत असाही विश्वास वाटतो. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. बंडखोरी होऊ नये यासाठी आमचे निश्चितपणे प्रयत्न राहतील असे ही त्यांनी म्हटले आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दिनांक 15 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत याबाबत भुमिका स्पष्ट करणार असल्याने येत्या काही तासात हालचालींना वेग येणार हे निश्चित.