मुंबई : भाजपाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या हत्येसाठी दहशतवादी अजमल कसाब नव्हे तर आरएसएसशी संबंधित दोन पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा दावा करून वादाला तोंड फोडले.

माजी पोलीस अधिकारी एसएम मुश्रीफ यांच्या Who Killed Karkare या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी निकम सरकारी वकील असताना त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला वाचविण्याची भूमिका घेतली असे वडेट्टीवार म्हणाले. भाजपाने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी एसएम मुश्रीफ यांच्या पुस्तकाकडे बोट दाखविले. आता खुद्द एसएम मुश्रीफ यांनी याबद्दलची भूमिका मांडली आहे.

दरम्यान, टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना एसएम मुश्रीफ म्हणाले, “मी २००९ साली Who Killed Karkare हे पुस्तक लिहिले होते. आजवर या पुस्तकाच्या अनेक प्रती निघाल्या आहेत. मात्र उज्ज्वल निकम यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली. मलाही वाटत होते की, उज्ज्वल निकम यांज्याबद्दल बोलावे. कारण ते या सर्व प्रकरणात सरकारी वकील होते. सत्य लोकांपुढे आणण्याची त्यांची जबाबदारी होती. हेच सत्य मी पुस्तकाच्या स्वरुपातून समोर आणले होते.”

हेमंत करकरेंना नेमकी कुणाची गोळी लागली?
हेमंत करकरे हे अजबल कसाबच्या नाही तर पोलिसांच्या गोळीने शहीद झाले, असा आरोप वडेट्टीवार यांनी मुश्रीफांच्या पुस्तकाचा हवाला देऊन केलाहोता. त्यावर बोलत असताना मुश्रीफ म्हणाले, “एखाद्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाल्यास, त्याच्या शरीरातील गोळ्यांचा बॅलेस्टिक रिपोर्ट काढला जातो. ज्या शस्त्रातून गोळ्या झाडल्याचा संशय असतो, त्या शस्त्रांचीही तपासणी केली जाते. हेमंत करकरे यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधील किंवा त्याचा साथीदार इस्माइल याच्याही रायफलमधील नव्हत्या.”

“बॅलेस्टिक चाचणी अहवालात ही बाब स्पष्ट केलेली आहे. त्याचवेळी शवविच्छेदन अहवालत असे दिसले की, मानेच्या बाजूला खांद्यातून पोटात पाच गोळ्या मारल्यामुळे करकरेंचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. त्यातील तीन गोळ्या निघून गेल्या. दोन गोळ्या पोटात अडकल्या. ही बाब उज्ज्वल निकम यांच्यासमोर आली होती.या गोळ्या कुणी झाडल्या याचा तपास करण्यास न्यायालयाला विनंती करणे, हे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची जबाबदारी होती. मात्र त्यांनी हे अहवाल कुठेही रेकॉर्डवर आणले नाहीत”, असा आरोप एसएम मुश्रीफ यांनी केला.