कोल्हापूर : गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूर लोकसभेची तयारी करत आहे. गावागावात जावून ते लोकांना भेट आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून त्यांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. मात्र ऐनवेळी शाहू महाराज छत्रपती यांचे नाव पुढे आल्याने चेतन नरके यांचे नाव मागे पडले. यातच चेतन नरके यांनी आज पत्रकार परिषद घेत मी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा लढणार आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हातकणंगले लोकसभा लढण्यासाठी ऑफर देण्यात आली होती त्यासंदर्भात संजय राऊत यांना आपण हातकणंगलेमधून निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटला असल्याने काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले चेतन नरके यांची मात्र गोची झाली. ते गेल्या दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी करत आहेत. पण ऐनवेळी कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला सुटल्याने चेतन नरके यांना उमेदवारी मिळण्याची अशा धूसर झाली. पण चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा लढण्याचा निर्धार केला असून आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर लोकसभा लढणार असल्याची घोषणा केली. तसेच मी सध्या कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार. येत्या काही दिवसात याबाबत अधिक माहित देणार, असेही ते यावेळी म्हणले.