मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. आज मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तरीही मात्र महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्याप कायम आहे. नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच चालूच असल्याचे पाहायला मिळत आहे . महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे.

एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाशिकच्या जागेवर दावा केल्याने या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर भाजपकडून देखील नाशिकमध्ये आमची ताकद अधिक असल्याचा दावा करत या जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेसाठी आपसात लढत पाहायला मिळत आहे. कोणताही पक्ष नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीचे ज्येष्ठ नेते काय भूमिका मांडतात. हे पाहणे महत्वाचे असनार आहे.

छगन भुजबळ नेमकं काय बोलणार?

आता मंत्री छगन भुजबळ हे महत्त्वाच्या विषयावर आज तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात ते माध्यमांशी संवाद साधतील. नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक आहेत. मात्र अद्याप या जागेचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.