मुंबई – मराठी चित्रपट सृष्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक हा उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक म्ह्णून ओळखला जातो. त्याने अनेक सुपर हिट सिनेमामध्ये काम केलं आहे. प्रसाद ओक हा चित्रपटांसोबतच अनेक रियालिटी शो मध्ये परिक्षकाची भूमिका सुद्धा साकारताना पाहायला मिळतो. प्रसाद ओक नेहमी कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतो. आज तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता प्रसाद ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयी सांगितलं. कोरोना काळात बायो-बबलमध्ये शूटिंग करताना प्रसादच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी प्रसाद त्यांच्या अंत्यविधीलाही पोहोचू शकला नव्हता. असा तो म्हणाला.

काय म्हणाला प्रसाद..?

प्रसाद म्हणाला . “कोरोनाची पहिली लाट येऊन गेल्यानंतर आपण सगळेच एका अनामिक भीतीत जगत होतो. कोरोनाची थोडी झळ कमी झाल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये शूटिंग करण्याची परवानगी दिली होती. पण त्यासाठी मुंबईबाहेर जाणं गरजेचं होतं. बायो-बबलमध्ये शूट करताना युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा माणूस आत येणार नाही. अशा कडक नियमांमध्ये आम्ही काम करत होतो. या शूटिंगसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं युनिट मुंबईबाहेर दमणला पोहोचलं होतं”, असं त्याने सांगितलं.

“दमणमधील एका हॉटेलमध्ये शोचा सेट उभारला गेला होता आणि तिथेच शूटिंग करण्यात येणार होती. 29 एप्रिलला आम्ही दमणला पोहोचलो. त्यानंतर 30 एप्रिल रोजी पहिल्या एपिसोडचं शूटिंग सकाळी 9 वाजता सुरू होणार होतं. आम्ही सकाळी 6-7 वाजता उठलो. मी उठून फ्रेश झाल्यावर फोन बघितला तर बायकोचे आठ ते दहा मिस्ड कॉल होते. तिला फोन करताच मला समजलं की माझे वडील गेले. पुण्यात माझे खूप चांगले मित्र आहेत. एका मित्राच्या माध्यमातून मी पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना मी विचारलं की आपण काय करू शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती खूप वाईट आहे. पार्थिव अर्धा-पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. तुम्हाला दमणहून पुण्याला यायला किमान सहा ते सात तास लागतील. आम्ही एवढा वेळ प्रतीक्षा करू शकत नाही. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाही”, असं तो पुढे म्हणाला.

कोरोनामुळे प्रसाद त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीला पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी त्याने भावाला व्हिडीओ कॉलद्वारे वडिलांना अखेरचं पाहण्याची विनंती केली. मात्र नियमांमुळे तेही शक्य झालं नव्हतं. वडिलांजवळ असलेल्या प्रसादच्या भावाला तिथे मोबाइल नेण्याची परवानगी नव्हती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे प्रसाद त्याच्या वडिलांना शेवटचं पाहूच शकला नव्हता. “थोड्या वेळाने भाऊ तिथे वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देत होता आणि मी इथे हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो”, अशा शब्दांत प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या.