सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे. विशाल पाटील हे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तरीही त्यांनी पक्षादेश न मानता बंडखोरी करत सांगली लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यावर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत ते भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान सांगलीतील तिरंगी लढतीत भाजपच्या संजय काका पाटील यांचे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना आव्हान असणार आहे. अशात हे सर्वच उमेदवार एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने सांगलीची निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे. विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विशाल पाटलांच्या या निर्णयावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वारंवार टीका केली आहे. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चंद्रहार पाटील यांनीही विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर विशाल पाटील भाजपची ‘बी’ टीम आहेत आणि ते भाजपच्या सांगण्यावरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना (UBT) उमेदवार चंद्रहार पाटील विशाल पाटील यांच्या सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल म्हणाले की “विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत असले तरी आम्हाला याचा एक टक्काही तोटा होणार नाही. ते भाजपची ‘बी’ टीम आहेत आणि भाजपच्या सांगण्यावरून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.