रायगड : या देशाच्या संसदेची निवडणूक देशाच्या अस्मितेची आणि देशाचे भवितव्य घडवणारी आहे. त्यामुळे ७ मे रोजी होणार्‍या निवडणूकीत घड्याळ चिन्हावर बटन दाबत १८ व्या लोकसभेत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी तळा येथील महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत केले.

बुधवारी रात्री शेवटची सभा तळा शहरात मोठया उत्साहात हजारो जनसमुदायासमोर पार पडली. सकाळी सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे पहिली सभा आणि त्यानंतर दिवसभरातील सहावी सभा तळा शहरात पार पडली.
माझ्या अनेक कसोटीच्या काळात हा तळा तालुका माझी ताकद ठरली आहे.. २००९ मध्ये साडेपाच हजाराचे मताधिक्य दिले. आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका वेगवेगळ्या लढलो आता मात्र यापुढच्या निवडणूका एकत्रितपणे लढवायच्या आहेत. या तालुक्याचे भरभक्कम प्रेम माझ्यावर आहे. त्यामुळे या तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान होईल आणि होणाऱ्या मतदानामध्ये ८० टक्के वाटा तळ्याचा असेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
या तालुक्यातून होणारे स्थलांतर तुमच्या – माझ्या दृष्टीने चिंताजनक आहे. या तालुक्यात जन्माला यावं आणि इथेच आयुष्य जगावं आणि त्यासाठी रोजगाराची साधने निर्माण केली जातील असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

गेल्या २५ वर्षाचा तळा तालुक्याचा प्रवास त्यानिमित्ताने डोळ्यासमोर आला. आज ज्यांच्याशी वर्षानुवर्षे राजकीय संघर्ष झाला त्या पक्षांशी आज महायुती झाली आहे याचा आनंद आहे. व्यापक हितासाठी एकत्र येतो तेव्हा एकजिनसीपणा कसा असावा हे तळा तालुक्यातील लोकांनी दाखवून दिले असेही सुनिल तटकरे म्हणाले.
देशाचे संविधान धोक्यात आले अशाप्रकारची भावना घेतली जात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिले त्यामाध्यमातून देश सुरू आहे. या देशाची घटना बदलली जाणार नाही असे आम्ही सांगत आहोत. पण तरीही आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

अनंत गीते तुमचे सर्व आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले. ए. आर. अंतुले यांचा उल्लेख हिरवा साप केलात. मुस्लिम समाजाला हिरवा अजगर त्याला ठेचून काढा असे आवाहन केलात आणि आज मतांसाठी अल्पसंख्याक आणि बहुजन समाजात जे सलोख्याचे वातावरण आहे ते जाणीवपूर्वक बिघडवण्याचे काम करत आहात असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी केला.

आम्ही घेतलेला विचार तुम्हाला पसंत आहे म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आंबेडकरी जनता एकत्रितपणे काम करत आहे. देशाला प्रगतीपथावर न्यायचेच आहे. या देशाची गौरवशाली वाटचाल करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे हेही सुनिल तटकरे यांनी भाषणात सांगितले.

तर विकासाचे मुद्दे नसल्याने पाकिटे देऊन माणसे स्टेजवर बोलावली जातात आणि टिका करायला लावली जात आहेत असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी तळा येथील जाहीर सभेत केला.
रायगडकर हुशार आणि सुज्ञ आहेत. तटकरेसाहेबांवर प्रेम करणारे आहेत. रायगडसाठी तटकरेसाहेबांचे तेवढेच योगदान असून त्यांनी पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत हेही आवर्जून सांगितले.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आदींसह महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.