मुंबई : शिवसेनेचे  नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील साई रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. आता तर परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. त्यामुळे परबांचे रिसॉर्ट जमीनदोस्त होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

किरीट सोमय्या यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला होता. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांच्या हातात हातोडाही होता. हातोडा हा जनतेच्या भावनेचे प्रतिक आहे. जर हे रिसॉर्ट पाडले नाही, तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. सध्या पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहे. या प्रकरणी पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहे. दिवाळीपर्यंत परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने ३१ जानेवारी २०२२ रोजी हा रिसॉर्ट ९० दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते; मात्र ९० दिवस पूर्ण होऊनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.