कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार ? यावर अद्याप पडदा पडलेला नाही. उद्धवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस आपली ताकद पणाला लावत यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुती कोणाला संधी देणार यावरुन तर्क – वितर्क लावले जात आहेत.

यात विद्यमान खासदारांना संधी मिळणार की नाही ? असा ही सवाल विचारला जात आहे. मात्र यावर एकाही लोकप्रतिनिधीने उत्तर दिलेले नाही असे असले तरी कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी यावर आज ठोस भुमिका स्पष्ट केली आहे.

खासदार संजय मंडलिक यांनी भुमिका स्पष्ट करताना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आपण लढणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या लोकसभेवर भाजपने दावा केला असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या (BJP) चिन्हावर लढावं लागेल अशीही चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी खुलासा करताना धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे म्हटलं आहे.

तसेच कोल्हापुरात शाहू महाराज यांची ही जोरदार चर्चा सुरु असल्याने यावर भाष्य करत खासदार मंडलिक म्हणाले, शाहू महाराजांना नेहमी वडिलांच्या समान मानतो. आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे. मात्र, निवडणुकीमध्ये समोर कोण आहे हे मी पाहिलेले नाही. त्यामुळे खासदार मंडलिक यांनी लढण्याची तयारी केली असल्याचं ही स्पष्ट झालं आहे त्या मुळे कोल्हापूर लोकसभेसाठी नेमकी कशी लढत होणार ? हा सवाल कोल्हापूरकरांना पडला आहे.