नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) सदस्यांच्या तक्रारीनंतर व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या दुसऱ्या माध्यमांमध्ये वारंवार सद्स्यांकडून तक्रार येत असल्यामुळे त्यांच्या समाधानासाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ईपीएफओच्या ऑनलाइन तक्रारींचे समाधान पोर्टल (EPFIGMS Portal), सीपीजीआरएएमएस (CPGRAMS), सोशल मीडिया प्‍लेटफॉर्म फेसबुक आणि ट्विटर, २४ तास काम करणारे कॉलसेंटर्स ग्राहकांसाठी उपलब्ध असतात.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओने आपल्या सदस्यांपर्यंत आणखी सहजरित्या पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस सुरू केली आहे. या सुविधेमुळे सदस्यांना आता घरबसल्या ईपीएफओसंबंधी कोणतीही माहिती आणि मदत मिळणे शक्य होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून सदस्य व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या जवळील कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकतात. आता ईपीएफओने त्यांच्या सगळ्या १३८ क्षेत्रातील कार्यालयांमध्ये ही सेवा सुरू केली आहे. ईपीएफओने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून सर्व स्थानिक कार्यालयांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केली आहेत. सदस्यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विचारलेल्या प्रश्नांना तात्काळ योग्य उत्तर देण्यासाठी एक खास टीम तयार करण्यात आली आहे.