नागपूर : संजय राऊत नागपूरला आले असता त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडून येतील, याची गॅरंटी नाही, मग ते जनतेला कसली गॅरंटी देत आहेत,असा सवाल करत त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी विजय हा इंडिया आघाडीचाच होणार, असा दावाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक उत्सवाच्या बाहेर येऊन बोलले पाहिजे. सभेमध्ये ते जी भाषा बोलतात, तशी गल्लीतील लोकसुद्धा बोलत नाही. पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत, पण महाविकास आघडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्वे येऊ द्या, परिवर्तनाची सुरुवात ही विदर्भातून होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत. रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल –

लोकसभा निवडणुकीपूर्वीचे जे सर्वे येत आहेत त्याच्याशी आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्रात शंभर टक्के यश मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस ‘४५ पेक्षा अधिक’ सांगत आहेत, त्यांचे आकडे काहीही असू द्या. त्यांना आकडे लावण्याची सवयच आहे. निवडणुकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल, महाराष्ट्रात आम्हाला ३५ पेक्षा अधिक आणि देशात ३०५ जागा मिळतील, असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.