चेन्नई ( वृत्तसंस्था ) बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे त्याचे आता चक्री वादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा राज्यात 24 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD च्या अंदाजानुसार, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला येथे वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची संततधार सुरू आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची योग्य काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.