कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या पाणीपुरवठा वसुली पथकाने शहरातील शाहू बँक, जासूद आणि डाकवे गल्ली परिसरात १ लाख २७ हजार ३६४ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले. यापुढील काळात थकीत पाणी बिलाची वसुली तीव्र केली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल यांनी दिली.

ते म्हणाले, थकीत पाणी बिलापोटी पथकाने विविध ठिकाणच्या पाच थकबाकीदारांची कनेक्शन बंद केली आहेत. थकीत पाणी बिलाच्या वसुलीसाठी यापुढेही विशेष पथकामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. नळ कनेक्शनधारकांनी आपले थकीत व चालूचे पाणी बिल तात्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे. यादवनगर शाहूमिल कॉलनी येथेही ७५ हजार १८४ रुपयांची वसुली केली आहे. तसेच थकबाकी वसुलीसाठी २ नळ कनेक्शन बंद केली. दोन ठिकाणी चोरुन होत असलेला पाणी वापर बंद केला आहे. एक अनधिककृत कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे.