सांगली: सांगलीत आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे. महाविकास आघाडीचा सांगली लोकसभेतून जो कोणी उमेदवार असेल, त्याला मिळणारी मते ही 100 टक्के काँग्रेसची असणार आहे. त्यामुळे आता पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही, यापुढे त्यांनी विधानसभा किंवा अजून काही मागायचे नाही, तसेच सांगलीच्या जागेचा वचपा काढणार असा इशाराच काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून ठाकरे गटाला देण्यात आला आहे.

सांगलीत आज काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळारसाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या वादावरून ठाकरे गटाला निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आमदार विश्वजीत कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामधून आपली भूमिका स्पष्ट करत आपल्या तोंडातून घास काढून घेतल्याची भावना व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही सांगली लोकसभेसाठी काम करत होतो. त्यामुळे माझी जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती, माझी जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती, काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणेपर्यंत होती. त्यामुळे मी काम करत होतो, असे यावेळी विश्वजीत कदम यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. ज्यामुळे सांगली लोकसभेत काँग्रेसकडून आधीपासूनच काम सुरू करण्यात आले होते, असेही कदम यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.

सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला गेल्यापासून आमच्या तोंडातला घास हिसकावून घेतल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे हे पुन्हा होऊ देऊ नका, मी तर पुन्हा होऊ देणारच नाही, अशी विनंती यावेळी विश्वजीत कदम यांनी या मेळाव्यात उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना केली आहे. कार्यकर्ते येऊन अनेक प्रश्न विचारतात. लोकसभेत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली त्याप्रमाणे विधानसभेतही सुटणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत असल्याचे यावेळी कदमांकडून सांगण्यात आले.

संजय राऊतांना सुनावले…
काँग्रेसने सांगलीच्या जागेवर दावा केल्यानंतर मविआत मीठाचा खडा पडला. त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला आज कदम यांनी नाव न घेता उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे गटाचे नेते म्हणतात की, यांचे विमान कुठे उडेल. मी सांगतो की सांगली जिल्ह्याचे विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे. फुले-शाहू-आंबेडकर-अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे. ते तिथूनच उडेल आणि तिथेच टेक ऑफ होईल, असा टोला यावेळी विश्वजीत कदम यांनी खासदार संजय राऊत लगावला.