मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र यांचे आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून रवींद्र बेर्डे घशाच्या कर्करोगानं आजारी होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं.


आज पहाटे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. दोघांनीही बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हेदेखील मराठी चित्रसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. रवींद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनयानं मराठी सिनेसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली होती. वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. २० व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात अभिनय केला होता.

रविंद्र बेर्डे यांनी चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, यासारख्या 300 हून अधिक मराठी चित्रपटात काम केलं होतं. शिवाय पाच हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला होता. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली.

अशा दिग्गज कलाकाराचं अचानक निधन झाल्यानं सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांना १९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते.