मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे आज (मंगळवार) दुपारी निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून ते कोरोनाने आजारी होते. त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

किशोर नांदलस्कर यांनी अनेक नाटके, मराठी आणि हिन्दी चित्रपटांसह दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. १९८९ साली प्रदर्शित झालेला ‘इना मिका डिका’ या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  ‘वास्तव’मधील देढ फुट्याचा दारुडा बाप – तुकाराम , ‘जिस देश में गंगा राहता है’मधील सन्नाटा या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी जवळपास ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे.

‘वासूची सासू’ हे दिलीप प्रभावळकर यांनी प्रचंड गाजवेलेले नाटक. नांदलस्कर यांनी यातील दिलीप प्रभावळकर यांनी केलेली दुहेरी भूमिका साकारण्याचे आव्हान पेलून आपल्या अभिनय कौशल्य सिद्ध केले होते. अत्यंत सहज अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. खाकी, हलचल, कुरुक्षेत्र, जान जाये पर वचन ना जाये,  या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. तर ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ हे त्यांचे काही गाजलेले मराठी चित्रपट.