नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई येथील माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी व्यापक बैठक झाली. या बैठकीत मराठा समन्वयक आक्रमक झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समन्वयक आणि पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त करत येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही ठोस निर्णय न घेतल्यामुळे  राज्यात आंदोलनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बैठकीत एमपीएससी परिक्षांबाबत चर्चा करण्यात आली. जर परीक्षा रद्द झाली नाही तर उधळून लावणार असल्याचा इशारा मराठा समजाकडून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आणि परीक्षा केंद्रावरसुद्धा आंदोलन करणार असल्याचेही म्हटले आहे.

बैठकीस माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, खा. संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा संघटनांची पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्यानिमित्ताने उदयनराजे आणि संभाजीराजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले.