कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहराच्या काही भागांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळामुळे पावसाने हजेरी लावली होती. परंतु, या अवकाळी पावसानंतर पाराही घसरला असून वातावरणात थंडी जाणवत आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

मंदोस वादळाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सिद्धनेर्ली, बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावांमध्ये पाऊस झाला. सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस सुरूवात झाली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, रविवारी रात्री, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा तसेच भुदरगड तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात मोठा पाऊस झाला.

जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरु आहे. मतदानापूर्वी रविवारच्या सुटीचा दिवस गाठून सर्वांनीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावला होता. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्साहावर पाणी फेरले. अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी ऊसतोड हंगामावर सातत्याने परिणाम होत आहे. शेतात पाणी साचल्यानंतर तोडणीवर परिणाम झाला आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकणावरही दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसामुळे बागायतदारांती चिंता वाढली आहे. हवामान विभागाने हा अवकाळी पाऊस पुढील चार दिवस असण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील १४ जिल्ह्यांमध्ये १६ डिसेंबर या दिवसात ढगाळ वातावरण असेल. शिवाय या काळात पावसाच्या हलक्या सरी देखील बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.