कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा तरुणांना नियुक्तीसाठी ऑर्डर मिळाली परंतु त्यांना कामावर घेतले जात नाही. आरक्षण हे मिळणारच आहे. मात्र, तुमच्या हातात जे आहे ते आधी करा. याला तुम्ही चेतावणी समजा अगर विनंती, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज (रविवार) मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूरात न्यायिक परिषदेवेळी बोलत होते.
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित न्यायिक परिषदेत करण्यात आलेले ठराव असे, सुप्रीम कोर्टामध्ये कोल्हापुर सकल मराठा समाजाच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ नेमणे, महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून १०२ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ३४२ ए प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी, एमपीएससी आणि इतर राज्य सरकारच्या नोकरीसाठी सर्वांच्या वयोमर्यादा दोन वर्षे वाढवून द्यावी, महाराष्ट्र सरकारच्या व खासगी शैक्षणिक संस्था यामध्ये झालेल्या प्रवेशाना संरक्षित करावे त्यासाठी आवश्यक त्या जागा वाढवाव्यात तसेच आर्थिक तरतूद आवश्यक असल्यास करावी.
तसेच ओबीसीच्या अनुषंगिक आणि तत्सम लाभ मराठा समाजाला मिळावेत, सीईबीसीच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश करून नवीन यादी राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावी,याकरिता राज्यपालांची भेट घेणे, ५० टक्के आरक्षण कोटा काढून टाकणे बाबत राज्यघटनेत दुरुस्ती करणे बाबत महाराष्ट्र विधानसभेने विशेष सत्र बोलावून ठराव करावा व तो कायदेमंडळास व पंतप्रधानांना पाठवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणे, आरक्षणाचा लढा हा एसईबीसीचा असावा आपण ईडब्लूसीमध्ये समाविष्ट होऊ नये, ईडब्लूमध्ये समाविष्ट झाल्याने कदाचित सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असे ठराव करण्यात आले.
खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय २०१४ ते २०२० पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? यावर सरकार विरोधात याचिका दाखल करणार आहे. वकिलांच्या कार्यावर माझा विश्वास आहे. मात्र, सरकारने यंत्रणा तयार ठेवली पाहिजे. मागास आयोगाने आपल्याला मागास जाहीर केले आहे. हातात ईएसबीसी असताना तुम्ही आर्थिक मागासची ईडब्लूएस अपेक्षा का करता ? उद्या जर ईडब्लूएस घेतले तर सर्वोच्च न्यायालय विचारेल. तुम्हाला अगोदर आरक्षण असताना तुम्ही ईएसबीसी आरक्षण का मागता ? त्यामुळे समाजाची भूमिका मराठा आरक्षण मिळवणे हेच पाहिजे. जे लोक इडब्लूएसचे समर्थन करतात त्यांनी लिहून द्यावे की, मराठा आरक्षणाला फटका बसणार नाही, असे खा. संभाजीराजे म्हणाले.
तर केवळ मराठा समाजाला एकत्र आणणे माझे ध्येय नाही तर बहुजन समाजाला सोबत एकत्र घेऊन जाणे माझा विचार आहे. त्यामुळे बहुजन समाजाने आवाज उठवणे गरजेचे आहे. आरक्षणाची तिसरी लढाई ही न्यायिक असल्याचे खा. संभाजीराजे यावेळी म्हणाले.
या परिषदेला अॅड. श्रीराम पिंगळे, अॅड. आशिष गायकवाड, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. जयंत पाटील, अॅड. रणजित गावडे, जयेश कदम, दिलीप पाटील, दिलीप देसाई तसेच सकल मराठा समाज आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील उपस्थित होते.