मुंबई (प्रतिनिधी) : अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या प्रकरणात ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. परंतु राज्यात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात टाकले जात आहे. कोणत्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे वातावरण आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सरकारवर सोडले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात आहे. सत्तेचा अहंकार सरकारला आला आहे. असले अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीही कुठेच चालत नाही. आम्ही या अहंकाराला योग्य ते उत्तर देऊ. कोणताही संघर्ष करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेसाठी सरकारला उत्तर देऊ. हे सरकार अहंकारी आहे या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहे. याबाबत अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.