मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत काल भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा झाली. यावेळी देशातील दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते. मुंबईत कार्यक्रम असल्याने उद्धव ठाकरेंनीही आवर्जुन हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात हिंदू बांधवांनो-भगिनींनो न म्हणत केली. यावरून विरोधकांनी ठाकरे यांना लक्ष करत टीका केली जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल (१७ मार्च)शिवाजी पार्कात राहुल गांधी यांच्या आधी भाषण केलं. त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो’ असं म्हणत करतात. परंतु, कालच्या भाषणात त्यांनी माझ्या तमाम देशबांधवांनो असं म्हणत सुरुवात केली. यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी ठाकरेंवर टीका केली. तसंच, आशिष शेलार यांनीही पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो अशा शब्दांत भाषणाची सुरुवात करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मात्र कालच्या भाषणात हिंदू शब्द वापरला नाही. त्यावरून महायुतीतील नेत्यांनी त्यांच्यावर शाब्दिक चिखलफेक केली. यावरून ठाकरेंनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला ? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झाली.. पण प्रश्न अनेक निर्माण करून गेलेय.. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल” आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!

भाजपाच्या या टीकेवर उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज हिंगोलीत जनसंवाद कार्यक्रमात बोलत होते. “मी काल माझ्या भाषणाची सुरुवात ‘माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो‘, अशी केल्यावर मोदीभक्तांनी माझ्यावर टीका केली. मला मोदीभक्तांना विचारायचंय, तुम्ही ’देशभक्त‘ नाही का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्हाला ते विरोधकांची आघाडी असे भाजपवाले म्हणतात. खरे आहे. आम्ही विरोधक आहोत, पण त्या हुकूमशहांचे विरोधक आहोत. जेव्हा जनता एकवटते तेव्हा तेव्हा हुकूमशहांचा अंत होतो. ‘फोडा अन् झोडा निती’ असणाऱ्या भाजपला तोडायची आज आम्ही शिवाजी पार्कवर शपथ घेत आहोत. शिवाजी पार्कवर घेतलेल्या शपथा खऱ्या झाल्याचा इतिहास आहे, असा गर्भित इशारा उद्धव यांनी दिला.

तसेच शंभूराज देसाई यांनी प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे. मात्र, शिवतीर्थ हे बाळासाहेबांच्या भाषणांसाठी ओळखलं जायचं. उद्धवजी सभेला संबोधित करताना हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणत करायचे. मात्र, काल तशी सुरुवात झाली नाही. बहुदा हा संगतीचा परिणाम असावा”,अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.