नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराचा झंझावात चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नांदेडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपा, शिंदे गटासह अजित पवार गटावर यावेळी उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा दोन टोकाच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्याचे नेतृत्व माझ्याकडे होते. त्या दोन वर्षांमध्ये सर्वच मित्र पक्षांनी खूप सहकार्य केले. मात्र, मधल्या काळात गद्दारी झाली नसती तर महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन गेले असते,अशी टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, “देशामध्ये हुकूमशाहीच्या विरोधात एक लाट उसळली आहे. सर्वांच्या मनामध्ये सध्या एक भिती आहे की हे संविधान बदलतील. गेल्या काही वर्षांत त्यांची वाटचाल त्याच दिशेने आहे. या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात. त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे दिसते. शेतकरी स्वत:हून सांगत आहेत की, यावेळी आमचे मत महाविकास आघाडीला. कारण महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते”.राज्यात महाविकास आघाडीचे 48 खासदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करून अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.