सिंधुदुर्ग : “या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना कायमची सुट्टी मिळेल, कारण त्यांच्याकडे आमदार-खासदार कोणीही राहणार नाही”, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधाकांच्यात आरोप – प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत हे आमनेसामने आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे विनायक राऊत यांच्यावरही सडकून टीका केली.कोकणात पूर येतो, दहा वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, असा कोणता प्रश्न विनायक राऊत यांनी सोडवला नाही. त्यामुळे हे प्रश्न आधी सोडवा. अडीच लाख कशाला म्हणतात? उमेदवारी अर्ज भरला तेव्हा जेमतेम अकाराशे लोक होते”, अशी टीका नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.

 “या निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदेंच्या गटात जातील. मग सहा राहतील. त्यापैकी किती येतील हे माहिती नाही. पुढच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल, कारण निवडणुकीनंतर आमदार खासदार कोणीही  राहणार नाही”, असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.