कोल्हापूर (प्रतिनिधी) : कदमवाडीत आज (बुधवार) सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घराची भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. घटनास्थळी अग्निशामक दलाने धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

याबाबत अग्निशामक दलाने दिलेली माहिती, कदमवाडी विठ्ठल मंदिर गल्लीत धनाजी पाटील यांचे घर आहे. त्यांच्याकडे चौगुले कुटुंब भाडेकरू म्हणून राहते. या घरातील गॅस सिलिंडरला गळती लागली. सकाळी सहाच्या सुमारास अचानक स्फोट झाला. यात घराची चौकट, खिडकीसह भिंतीचा काही भाग कोसळला. त्यात भाडेकरू विजया चौगुले (वय ५०) व उषा चौगुले (वय ५५) या दोघी बहिणी किरकोळ भाजून जखमी झाल्या. स्फोटामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी दोघी बहिणींना बाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.