कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाबाधित रूग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत चेन्नई येथून ६ हजार लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन साठवणूक टँक्स मागविलेल्या होत्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांच्या पाठपुराव्यामुळे टँक्स वेळेत दाखल झाले.

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, मोटर वाहन निरीक्षक युनुस सय्यद संजय पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शेखर राऊत तसेच वाहन चालक बाळासाहेब कुंभार यांच्या चमूने अतिशय नियोजनबद्ध कार्यवाही करून विहित मुदतीपूर्वी हे टँक्स शेंडा पार्क येथील कोव्हिड केंद्रात आणि संजय घोडावत विद्यापीठ येथील कोव्हिड केंद्र याठिकाणी पोहोच केले.

मुदतीपूर्वी आणि सुखरूपरित्या ऑक्सिजन टँकर चेन्नई येथून जिल्ह्यात आणल्याबद्दल टॅंकर चालकाचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसाद गाजरे यांनी सत्कार केला.