कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात शिरोली टोल नाक्यानजीक असलेल्या जुना जकात नाका पुलाजवळ देशी बनावटीचे पिस्टलसह जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना आज (शुक्रवार) सापळा लावून शहर डीवायएसपी विभाग आणि शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकऱणी विकी घोडीबा नाईक (वय ३१, रा. आमरोळी ता. चंदगड),  शुभम शांताराम शिंदे (वय २६, रा. अर्जुनवाडी ता. गडहिंग्लज ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून १ लाख रुपये किमतींचे मँग्झीनसह सिल्वर रंगाचे पिस्टल,१ हजार रुपये किंमतीचे २ जिवंत राऊंड आणि १० हजारांचा मोबाईल असा १ लाख ११ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला.

शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने शहर डीवायएसपी विभागाचे अधिकारी आणि शाहूपुरी पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून विकी नाईक व शुभम शांताराम शिंदे याला ताब्यात घेतले.  त्यांना शाहुपुरी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. त्यांच्याविरुध्द यापूर्वी शाहूपुरी, चंदगड व मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.