कोल्हापूर (प्रतिनिधी) : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून योगेश मनोहर शिंदे (वय २८, रा. बालावधूत नगर, फुलेवाडी) या रिक्षाचालकाचा त्याच्याच मित्रांनी डोक्यात दगड घालून खून केला. सोमवारी रात्री हा प्रकार वडणगे पोवार पाणंद रस्त्यावरील बंडगर मळ्यात घडला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दीपक रघुनाथ पोवार (वय ३५, रा. उद्यम नगर), सागर दत्तात्रय चौगले (वय ३०, रा. म्हाडा कॉलनी. संभाजीनगर) यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उसने दिलेले ५० हजार रुपये परत द्यावेत यासाठी शिंदे याने पोवार आणि चौगले यांचेकडे तगादा लावला होता. या रागातून शिंदे याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. बंडगर मळ्यात घडलेल्या या प्रकारची माहिती काही नागरिकांनी करवीर पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खुनाच्या प्रकारानंतर अवघ्या काही तासांत सोमवारी रात्रीच आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी शिंदे याची पत्नी मंजिरी (वय २८) यांनी फिर्याद दाखल केली. आज या आरोपींना न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.