अहमदनगर (प्रतिनिधी) : भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज (गुरूवार)  सकाळी पुण्याहून शिर्डीकडे रवाना झाल्या असता त्यांना नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी देसाई शिर्डीत येणार होत्या. परंतु त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत माध्यमांशी देसाई यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत बोर्ड लावला आहे. तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच रोखले. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.