कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन प्रशासक मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते  झाले. यावेळी कर्तव्य बजावत असताना घ्यावयाची काळजी तसेच काम करीत असताना सुरक्षिततेसाठी वापरावयाची साधने याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. अभियानामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत पंचमहाभूते म्हणजेच अग्नि, वायू, जल, पृथ्वी व आकाश यांचे जतन व संवर्धन राखणे ही आपली जबाबदारी असल्याने या निमित्ताने स्वच्छतेची हरित शपथ घेण्यात आली. तसेच शहरातील डॉ. अल्लामा इकबाल हायस्कूल, प्रभाग क्र. ४, एसटी स्टँड रोड येथे वृक्षारोपण करून कुरुंदवाड शहर हरीत करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच पालिकेच्या कामांचा आलेख उंचावत रहावा व नगरपरिषदेस या अभियानामध्ये अव्वल नंबर प्राप्त व्हावा, याकरीता कसोशीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे दिव्यस्वप्न फाउंडेशनने नेटके नियोजन केले. यावेळी माजी नगरसेवक दीपक गायकवाड, अक्षय आलासे, पालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.