कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील फाऊंडेशनच्या वतीने गणेशोत्सव काळात होणारी महिला भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन दि. ९ सप्टेंबरअखेर शहरातील गर्दीच्या प्रमुख ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापुरातील आकर्षक मूर्ती तसेच देखावे पाहण्यासाठी कोल्हापूरकर सहकुटुंब घराबाहेर पडतात. अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. कोल्हापूर शहराबरोबर उपनगरे आणि शहरालतच्या गावातून लोक देखावे पाहण्यासाठी येतात. कोल्हापुरातील रस्त्यांवर देखावे पाहण्यासाठी प्रमुख ठिकाणी रस्ते गर्दीने ओसंडून वाहतात. शहरात काही ठिकाणी व चौकात महानगरपालिकेची स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत पण गणेशोउत्सावातील गर्दीसाठी ती अपुरी पडतात. या गर्दीवेळी पुरेशा स्वच्छतागृहांच्या संख्याअभावी महिलाची गैरसोय होते.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी सतेज पाटील फाऊंडेशनच्या वतीने शहरातील प्रमुख ठिकाणाचा सर्व्हे केला आहे.  फाऊंडेशनच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या या स्वच्छतागृहांत पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहांपासून काही अंतरावर पडदे बांधून हा एरिया गर्दीपासून स्वतंत्र केला आहे. या परिसरात विद्युत दिव्यांची व्यवस्था केली आहे. या स्वच्छतागृंहाच्या परिसरात खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.