कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफाळा घोटाळा, नळ पाणीपुरवठा, जयप्रभा स्टुडिओ यासह अनेक विषयावर आज (मंगळवार) कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. या सभेमध्ये जवळपास १४ कार्य पत्रिकेवरील आणि चार पुरवणी पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली. यामध्ये रक्तपेढी, छ. प्रमिलाराजे रुग्णालय नळ कनेक्शन,हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस कनेक्शन, प्रधानमंत्री आवास योजनेस अनेक विषयावर चर्चा झाली. पण आजची सभा घरफाळा घोटाळा, नळ पाणीपुरवठा, जयप्रभा स्टुडिओ या विषयावर गाजली.

या सभेमध्ये, कोरोनाच्या काळात सेवा करताना अनेक कामगार मरण पावले आहेत त्यांच्या नातेवाईकाना तात्काळ मदत मिळावी. तसेच कुटुंबातील एकाला त्वरीत नोकरीत सामावून घ्यावी अशी मागणी केली. यासाठी काही अटी आणि शर्थीमध्ये सवलत द्यावी लागली तर द्यावी असेही सांगण्यात आले. अनेक ठिकाणी पाण्याची कनेक्शन विनापरवाना वापरत आहेत. अनेक ठिकाणी मीटर बंद आहेत. शहरातील सर्व हॉटेल आणि लॉजमधील पाणी कनेक्शन यांची तपासणी करावी अशी मागणी केली.

शहरात जवळपास सव्वा लाख नळ कनेक्शन आहेत. पण यातील पन्नास टक्के कनेक्शन ही विना मीटरची आहेत. त्यामुळे यामध्ये मीटर रीडिंग घेणारे कर्मचारी हे चुकीची माहिती देतात. पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होऊनसुद्धा यावर अधिकाऱ्यांचा कोणताही प्रतिबंध नाही. या उलट मीटर रीडर लोकांनाच कारवाई करतो म्हणून अर्थपूर्ण व्यवहार केले जातात. अंबाबाई मंदिराच्या आसपास असणाऱ्या हॉटेल आणि लॉजकडून पाणी चोरी केली जाते असे नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आरोप केले. तर मीटर रीडिंग करणाऱ्यांच्या गळ्यात आणि हातात सोन्याचे दागिने पाहून  डोळे पांढरे होतात याबद्दल नगरसेवक सत्यजित कदम यांनी सभागृहात आश्चर्य व्यक्त केले. एकंदरीत नळपाणी कनेक्शनवरून नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी धारेवर धरले.

हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस कनेक्शन पाईपलाईन करणेस काही हरकत नाही. पण यामध्ये खुदाई केलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित कंपनीकडून लेखी हमी घ्यावी या उपसुचनेसह मंजुरी देण्यात आली.  तसेच जयप्रभा स्टुडिओच्या जागेवरून परत एकदा मोठा गोंधळ झाला. यामध्ये अधिकाऱ्यांनी आयुक्तांना चुकीची माहिती देऊन फसविल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतल्यामुलेच परत-परत हा विषय सभेमध्ये आणला जातो असा आरोप नगरसेवक शेटे यांनी केला. त्यामुळे हा विषय जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी स्टार बाजार,बिग बाजार, डॉमिनोज पिझ्झा, आयएनसी कॉम्पुटर क्लास, आयसीआयसीआय पृडन्शियल कंपनी या मिळकतीच्या एक कोटी सव्वीस लाख रुपयांच्या टाळ्यासंदर्भात कागदपत्रासहित सभागृहात माहिती दिली. यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. नाहीतर महापालिकेच्या सभेत आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले.