कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस. म्हणूनच आज निवडणूक लढवणाऱ्या  या दोन्ही आघाड्यांकडून उमेदवार निश्चित करून पॅनलची घोषणा करण्यात आली. ज्यांना उमेदवारी मिळाली ते सोडून इतरांनी माघार घ्यावी यासाठी आवाहन आणि इतर पद्धतीने समजावण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे अनेकांनी निवडणूक कार्यालयात जाऊन माघार घेतली. या सर्व घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणातील आजचा दिवस महत्त्वाचा ठरला.

सत्तारूढ आघाडीचे नेते ‘गोकुळ’ संघ सध्या किती चांगला चाललाय आणि यापुढेही असंच चांगला चालायचा असेल तर ‘गोकुळ’मध्ये सत्ता आमचीच असली पाहिजे, हे मतदार आणि दूध उत्पादक सभासदांच्या मनात  ठसवण्याचे काम करीत आहेत. आघाडीचे नेते आ. पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘राजर्षी शाहू आघाडी’  असे नामकरण करीत आपल्या पॅनलची घोषणा केली. या वेळी या आघाडीत गोकुळसाठी काही नवे चेहरे पुढे आणले. पण बहुतेक उमेदवार हे  विद्यमान संचालक किंवा संचालकांचे  आणि  नेत्यांचे वारसदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘राजर्षी शाहू शेतकरी आघाडी’ या नावाने विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची नावे जाहीर केली. या आघाडीतील इतर सर्व प्रमुख नेते आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत आ. सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या या पॅनेलमध्ये आघाडीचे नेतृत्व करणारे मंत्री, आमदार, खासदार आणि नेत्यांचे वारसदार आणि नातेवाईकच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, काही सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे.

‘गोकुळ’मधील सत्तारूढ आघाडीपेक्षा आम्ही  चांगला कारभार करणार,  जादा दूध दर देणार आणि शेतकऱ्यांना न्याय आणि सन्मान देणार असा या आघाडीचा दावा आहे. ‘गोकुळ’च्या लढाईसाठी दोन्हीकडून शिलेदार ठरले आहेत. निकराच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेले आहे. आता ‘कोण जिंकणार, कोण हरणार’ याचीच  उत्सुकता आहे.