धामोड ( प्रतिनीधी ) राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील शेतकरी संघटनेचे आर. डी. कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली धामोड येथील ओंकार शुगर फराळे, भोगावती साखर कारखाना, डी. वाय. पाटील साखर कारखाना आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना या गट ऑफिसना धामोड येथील शेतकरी संघटनेच्यावतीने आज निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मा. खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आपली संघटना कार्यरत असून त्यांनी जाहीर केलेल्या प्रमाणे मागील वर्षाचे चारशे रुपये आणि चालू गणित हंगामासाठी साडेतीन हजार पहिली उचल दिल्या खेरीज कोणत्याही शेतकऱ्याच्या उसाला तोड देऊ नका.

कारखाना प्रशासनाकडून अधिकाराचा वापर करून एखाद्या कर्मचाऱ्यांच्या उसाला तोड घेतली तर होणाऱ्या नुकसानीस संघटना जबाबदार राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याच्या अथवा कर्मचाऱ्याच्या ऊसाला तोड घेऊ नये. यावेळी कुमार कुरणे, तुकाराम दळवी, विठ्ठल लव्हटे, महादेव पाटील , पांडुरंग कुरणे, अनिल तेली, संदीप फडके आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.