मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली (प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला होता. पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भातील बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द केल्याने चिडून पियुष गोयल यांच्या गुंडांनी नेहा पुरव याच्या राहत्या घरी जाऊन त्यांना धमकावले. ही अतिशय गंभीर बाब असून पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत असून या प्रकरणी पियुष गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करून धमकी देणा-या गुंडांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. महाराष्ट्राला निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मोठा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासून महाराष्ट्राच्या भूमितीतील पत्रकारांनी लोकशाहीला समृद्ध करण्याचे आणि दिशा देण्याचे कार्य केले आहे पण केंद्रातील भाजप सरकारला लोकशाही नको आहे. म्हणून त्यांनी लोकशाहीचे चारही स्तंभ आणि स्वायत्त संस्थावर हल्ले करणे सुरु केले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपची हीच कार्यपद्धती पुढे घेऊन जात आहेत. हायप्रोफाईल कुटुंबातून आलेल्या गोयल यांना मासळीचा वास आणि निष्पक्ष पत्रकारिता सहन होत नाही. त्यामुळेच त्यांच्या गुंडानी काल गुरुवारी रात्री १० वाजता त्यांच्या घरी जावून “पुन्हा मच्छीची बातमी छापू नका” अशा शब्दांत धमकी दिली आहे. पत्रकरांना धमक्या देऊन पियुष गोयल आपला पराभव टाळू शकत नाहीत असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.