कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. ही तर नारायण राणेंची राजकीय अधोगती असल्याची टीका आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे युवा महाराष्ट्रभिमान मेळाव्यात केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा कुडाळ येथे खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार राजन साळवी यांच्यासह युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विशाल जाधव, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, सुशांत नाईक, युवतीसेनेच्या रुची राऊत आणि युवासेना, युवक कॉंग्रेस, युवक राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले की, आपल्या समोर आलेल एखादे संकट हिच उत्तम संधी असते. युवकांसमोर राजकीय भवितव्य घडवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. मी आणि राजन साळवींनी त्यावेळी तळागाळापर्यंत पोहोचून काम केले. त्यामुळेच आम्ही आमदारकी उपभोगली. त्यावेळीही आम्ही युवासेनेचे कार्यकर्ते होतो. तळागाळापर्यंत पोचलेला कार्यकर्ता खा. विनायक राऊतांसारखा दुसरा कोणी नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा विजय निश्चित आहे.

याउलट विरोधकांकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात चारचार मंत्री असून सुद्धा या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख कोण तर गोव्याचा मुख्यमंत्री. याचाच अर्थ पक्षाचा जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास नाही. त्यातही भाजप पक्षाकडून अजूनही नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणजे ही नारायण राणेंची राजकीय अधोगतीच आहे. रामाच्या, धर्माच्या नावावर राजकारण करण्याच काम भाजप करत आहे. मोदी गॅरंटीवर बेरोजगार युवकांना बॅंक कर्ज देणार का ? असा खोचक सवालही आ. नाईक यांनी विचारला.

विनायक राऊतांना यावेळी दोन लाख मताधिक्य मिळवून द्यायच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई तुमची तरुणांची लढाई आहे. येत्या निवडणूकीत ३० टक्के तरुण मतदार मतदान करणार आहेत. आपण सर्वजण आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीची युवासेना मिळून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देवू अशी ग्वाही आ. नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांना दिली.

आम्ही सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळतो त्यामुळेच आम्हाला सर्व सामान्यांचे प्रश्न कळतात आणि ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी उभी आहे. आम्ही तुमच्यासारखे पक्ष बदलत फिरत नाही. असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी विरोधकांना लगावला.