खास.प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर परिसरात कोपरा सभा

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : भारताला स्वातंत्र्य मिळून सुमारे ७५ वर्षे झाली तरी आजही भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता दिसून येते. यामध्ये बहुतांश झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिक आर्थिक सक्षम नसल्याचे दिसून येते त्याचमुळे त्यांचे राहणीमान आजही उचावले गेलेले नाही. शहरात आजही झोपडपट्टीधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश उपनगरातील झोपडपट्ट्यामध्ये मुलभूत सोयी सुविधांसह अनेक विकास कामांचा वाणवा जाणवतो. झोपडपट्टीधारकांना न्याय देण्याकरिता त्यांचे राहणीमान उंचावण्याकरिता झोपडपट्टीधारकांना त्याच जागी घरकुले उभी करून त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता पुनर्वसन प्राधिकरण योजना अंमलात आणली आहे. येत्या तीन महिन्यात शहरासह उपनगरातील झोपडपट्टीधारकांना कार्ड उपलब्ध करून झोपडपट्टी धारकांच्या मागणी नुसार झोपडपट्टी पुनर्वसन आराखडा तयार करून झोपडपट्टीधारकांचे राहणीमान उंचावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ सुधाकर जोशी नगर चौक येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, गेल्या ६० दशकात कॉंग्रेस सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या झोपडपट्टीधारकांची फसवणूक केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टींपासून झोपडपट्टीधारकांना वंचित ठेवून त्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे. निवडणुकीपुरता त्यांच्या मतांचा वापर करून अनेक आमिषे दाखवली गेली पण प्रत्यक्षात निवडणुकीनंतर याठिकाणी फिरकण्याचे कष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांना घेता आले नाही. याउलट गेल्या दहा वर्षात केंद्र शासनाकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, जगातील सर्वात मोठी आयुष्यमान भारत आरोग्य योजना, मुलींच्या जन्माचे स्वागत करणारी सुकन्या समृद्धी योजना, राज्य शासनाकडून महिलांना एस.टी.प्रवासात ५० टक्के सुट, मुलीना मोफत उच्च शिक्षण, आनंदाचा शिधा याद्वारे गोरगरिबांच्या हक्काच्या गरजा पूर्ण करण्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेस राजवटीमध्ये गोरगरिबांची झालेली फसवणूक आणि महायुतीच्या काळात गोरगरिबांचा झालेला सन्मान याचा फरक ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गोरगरीब जनता राहील असा विश्वास व्यक्त करत महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शिवसेना अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष प्रभू गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, मा.नगरसेवक अमोल माने, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, यांच्यासह भागातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.