टोप (प्रतिनिधी) : शिरोली येथे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच क्वारंटाईन व्यक्ती बाहेर फिरताना दिसत आहेत. यावर आवर घालण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शशिकांत खवरे यांनी दिली.

गावात कोरोनाग्रस्तांची संख्या तीनशेच्या जवळ गेली आहे. यामुळे अधिक धोका निर्माण झाला असून या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यास नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. गावात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई ग्रामपंचायत, व्यवस्थापन समिती आणि पोलीस प्रशासनातर्फे दररोज केली जात आहे.

स्वॅब तपासणीस दिलेल्या व्यक्तीने रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. मात्र स्वॅब दिलेली व्यक्ती गावभर फिरत असल्याचे चित्र आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीने स्वॅब दिल्याचे समजते. त्यामुळे अनेकांना त्याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा बेफीकीर व्यक्तींमुळे गावातील कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्ती फिरताना दिसल्यास त्यांच्यावर ५ हजार रुपये दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच खवरे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, उत्तम पाटील, जोतीराम पोर्लेकर आदी उपस्थित होते.