दिल्ली (वृत्तसंस्था) : तब्बल दोन वर्षांनी राज्यासह देशभरात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज घराघरात लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे. सणासुदीच्या काळातही महागाईने कळस गाठला असून, भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर नेहमीच जाहीर होतात; मात्र आज गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा १०० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. मंगळवारी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड तेल सोमवारी ०.३टक्क्यांनी घसरून युएसडी १०४.७० प्रति बॅरलवर आले आहे. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चे तेल सोमवारी ०.२ टक्क्यांनी घसरून ९६.७९ डॉलर प्रति बॅरलवर आले.

मेघालय आणि महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये सलग १०२ दिवस कोणताही बदल झालेला नाही. मोदी सरकारने २१ मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल ९.५० रुपये आणि डिझेल ७ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारने १४ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे ५ रुपये आणि ३ रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.