मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देऊनही त्यांनी नाकारले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. जर खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते, असे गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कोणताही फरक पडणार नाही. नाथाभाऊसोबत एकही आमदार किंवा पदाधिकारी जाणार नाही, असा दावाही दानवे यांनी केला. खडसेंचा वापर राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधासाठी करू नये, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला. नाथाभाऊ आमचे नेते होते. त्यांनी पक्ष सोडल्याने दु:ख होत आहे. परंतु पक्ष एका माणसांवर आधारित नसतो. कार्यकर्ते गावागावात आहेत. नाथाभाऊसोबत एकही आमदार आणि पदाधिकारी जाणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. कारण ते विचारधारेशी जोडलेले आहेत. उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे चिंता वाटत नाही. खडसे आता भाजपसाठी विषय संपला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.