साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा – वैभववाडी मार्गावर करूळ घाटात मालवाहतूक ट्रक सुमारे ४५० मीटर खोल दरीत कोसळला. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. हा अपघात रविवारी रात्री झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक ट्रक कोल्हापूरहून गोव्याकडे मैदा घेऊन निघाला असता गगनबावड्यापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर  ट्रक करूळ घाटातील दरीत कोसळला. यात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच गगनबावडा व वैभववाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांच्या साहाय्याने कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ट्रकवरील क्लिनरने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो किरकोळ जखमी झाला. पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.